#

Advertisement

Tuesday, September 29, 2026, September 29, 2026 WIB
Last Updated 2026-09-29T15:19:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदाराची महापालिका आयुक्तांना धमकी

Advertisement



९० कोटींच्या टेंड रवरून पुण्यात खळबळ

पुणे : पुणे महापालिकेच्या सुमारे ९० कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पाच्या निविदेवरून एका आमदाराने महापालिका आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. ‘तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो’, अशी धमकी आयुक्तांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, पथ विभागातील अधिकाऱ्यांनाही विधानसभेत हक्कभंग आणण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकाराला आयुक्त नवलकिशोर राम यांनी दुजोरा दिला असून संबंधित आमदाराचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.
आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने १७ मीटर रुंद आणि सुमारे दोन किलोमीटर लांबीचा वेलस्ली रस्ता विकसित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या कामासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यात आठ ठेकेदार सहभागी झाले होते. निविदा प्रक्रियेत एका पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवून आपल्या पसंतीच्या ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी संबंधित आमदाराने महापालिका प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप आहे. या कथित हस्तक्षेपामुळे निविदा प्रक्रिया सुमारे सात महिने रखडल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, निविदा प्रक्रिया बराच काळ प्रलंबित राहिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी नियमानुसार प्रक्रिया पुढे नेण्याचे आणि संबंधित ठेकेदारांच्या पात्रता-अपात्रतेबाबत कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर करण्यात आलेल्या छाननीत आमदारांकडून अपात्र ठरविण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा असलेला ठेकेदार पात्र ठरला.
विशेष म्हणजे, संबंधित पात्र ठेकेदाराने आमदारांच्या पसंतीच्या ठेकेदाराच्या तुलनेत सुमारे नऊ कोटी रुपये कमी खर्चाची निविदा सादर केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निधीची बचत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आपल्या पसंतीच्या ठेकेदाराला काम मिळाले नसल्याने संबंधित आमदाराने आयुक्तांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच पथ विभागातील अधिकाऱ्यांनाही दमबाजी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.