#

Advertisement

Tuesday, September 1, 2026, September 01, 2026 WIB
Last Updated 2026-09-01T14:10:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार?

Advertisement

सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

दिल्ली :  शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे. बुधवारपासून एकनाथ शिंदेंच्या वतीने वकील युक्तिवाद करणार आहेत. याआधी उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी सलग आठ दिवस युक्तिवाद केला होता. दरम्यान या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे एक दिवस आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
"मी दिल्लीत येत असतो. राज्य प्रमुखांच्या बैठका असून, त्यांना संघटनात्मक आढावा घ्यायचा आहे. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका असून, त्यासंदर्भातही चर्चा आहे. तसंच सुप्रीम कोर्टातील आतापर्यंत झालेल्या सुनावणीचाही आढावा घेतला जाईल. उद्यापासून शिवसेनेच्या बाजूने होणारा युक्तिवाद यासंदर्भातही चर्चा होईल. संघटनात्मक आणि अनेक राज्याच्या प्रमुखांसोबत चर्चा आहे," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
सुप्रीम कोर्टातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "ही अतिशय दुर्देवी आणि दु:खद बाब आहे. बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देवाऱ्यात धनुष्यबाण ठेवायचे, तो गोठवण्याची मागणी करणं दुर्देवी आहे. बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी 2019 मध्ये गोठवले, हिंदुत्वही गोठवलं. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल आणि बाळासाहेबांची घटनाही गोठवली. घटना बदलण्याचं काम त्यांनी केलं. आणि आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत, ते बाळासाहेबांचे विचार, भूमिका, धोरण, हिंदुत्वाचे विचार, राष्ट्रीयत्वाचे विचार पुसण्याचं काम दुर्दैवान होत आहे. पण आम्ही बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार घेऊन पुढे जात आहोत. जनतेनेही आम्हाला स्विकारलं असून, आशीर्वाद दिले आहेत".

'न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास'
सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदेंच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी, नीरज किशन कौल युक्तिवाद करणार आहेत. त्यासंदर्भात ते म्हणाले की, "आम्ही चर्चा करणार आहोत. जे काही लोकशाहीत बहुमत असतं, त्यावर निर्णय होत असतात. न्यायप्रविष्ट असल्याने जास्त भाष्य करु शकत नाही. आम्ही न्यायालयाचा आदर राखणारे, सन्मान करणारे लोक आहोत. काही लोक तर न्यायालयाही मार्गदर्शन करतात. निवडणूक आयोगाला मार्गदर्शन नाही, तर बेछुट आरोप करतात. त्यामुळे आमची तशी भूमिका नाही. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे".