Advertisement
पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाइन-३ सुरू होण्याची पुणेकरांची प्रतीक्षा आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबरच्या वाढदिवसाच्या आसपास या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होण्याची चर्चा होती. मात्र, १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन झाले नाही. त्यामुळे आता मेट्रो सुरू होण्यासाठी नव्या तारखेची प्रतीक्षा आहे.
आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर आणि उद्घाटनाचा अंतिम कार्यक्रम निश्चित झाल्यावर सप्टेंबरअखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे ऑनलाइन उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, उद्घाटनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाची लांबी सुमारे २३.२ किलोमीटर असून या मार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हिंजवडीतील आयटी हब आणि पुणे शहर यांच्यातील प्रवास अधिक सुलभ करणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील स्थानकांसाठी २३ जुलै रोजी प्रवासी सेवा सुरू करण्यास सुरक्षा मंजुरी मिळाली होती. सुरुवातीला १२ स्थानकांवरून मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, आता १७ स्थानकांवर एकाच वेळी प्रवासी सेवा सुरू करण्या ची तयारी केली जात आहे. यासाठी आणखी पाच स्थानकांच्या सुरक्षा तपासण्या पूर्ण होणे आवश्यक आहे. हिंजवडी, बाणेर, बालेवाडी तसेच मध्यवर्ती पुणे परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या मार्गामुळे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच रस्त्यावरील वाहतुकीचा ताण आणि कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. आता सुरक्षा प्रक्रिया आणि अंतिम कार्यक्रम पूर्ण होऊन मेट्रो सेवा नेमकी कधी सुरू होणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
