Advertisement
माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचा सहभाग लक्षवेधी
मुंबई : अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड) मागणी प्रलंबित राहिल्यामुळे मातंग समाजाकडून मंगळवारी (ता. २९) मुंबईत आंदोलन करण्यात आले. समाजाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सोलापूर जिल्ह्यातील हजारो समाज बांधव मुंबईतील मोर्चात सहभागी झाले होते.
हे आंदोलन आझाद मैदानावर होणार होते. मात्र, पोलिसांना गाफील ठेवून मातंग मोर्चातील आंदोलकांनी सीएसएमटी स्थानक परिसरात रस्त्यावर उतरून येथील वाहतूक पूर्णपणे बंद करुन टाकली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा असूनही मातंग मोर्चातील आंदोलकांनी सीएसएमटी परिसर, बीएमसी मुख्यालयाचा परिसर व्यापून टाकला. त्यामुळे मंत्रालयाकडे जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता होती. मातंग मोर्चातील आंदोलकांना रस्त्यावरुन दूर करण्याचे पोलिसांचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, हे आंदोलक काही केल्या ऐकायला तयार नव्हते. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत शासन निर्णय झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, अशी ठाम भूमिका मातंग आंदोलकांनी घेतली. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला.
आझाद मैदान परिसरात मातंग समाजाकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. आझाद मैदानाऐवजी हे आंदोलक सीएसएमटी स्थानक, मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आणि सेल्फी पॉईंट अशा सर्व ठिकाणी ठाण मांडून बसले. त्यामुळे येथील चौकात प्रचंड गर्दी झाली. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्यात आली. तुम्हाला आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी आहे. त्यामुळे इथून बाजूला व्हा, अशी विनवणी पोलिसांनी केली. मात्र, मातंग समाजाचे काही आंदोलक रस्त्यावर झोपले. ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, काही आंदोलक हे बेस्टच्या बसवर चढले. या सगळ्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मातंग समाजाचं आंदोलन स्थगित : ऍड. कोमल ताई साळुंखे-ढोबळे
मातंग समाजाच्या अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती अड. कोमलताइ साळुंखे-ढोबळे यांनी दिली. उपवर्गीकरणाचा शासन निर्णय लागू करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने मुंबईत आंदोलन केले. सरकारकडून आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन तात्पुराते स्थगित करण्यात आल्याचे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.
