#

Advertisement

Wednesday, October 21, 2026, October 21, 2026 WIB
Last Updated 2026-10-21T16:33:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला

Advertisement

मुंबई : महागाईमुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आता धान्याच्या वाढत्या दरांचा फटका बसत आहे. ज्वारीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून चांगल्या दर्जाच्या ज्वारीचा दर किलोमागे १०० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रोजच्या जेवणातील भाकरीही महाग झाली आहे. गेल्या काही आठवड्यांत ज्वारीच्या दरात किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनावर झालेला परिणाम, बाजारात कमी झालेली आवक आणि मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा यामुळे ज्वारीचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्याभरात ज्वारीच्या विविध प्रकारांच्या दरात वाढ झाली आहे. शाळू ज्वारीचा दर पूर्वी किलोमागे ६५ रुपये होता. आता तो १०५ ते ११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकारच्या ज्वारीच्या दरात किलोमागे सुमारे ४० ते ४५ रुपयांची वाढ झाली आहे. गावरान ज्वारीचे दर पूर्वी ५५ रुपये असताना आता ते ६० ते ७५ रुपये किलोपर्यंत गेले आहेत. तर दुरी ज्वारीचा दर पूर्वी ३५ ते ४० रुपये होता. सध्या या ज्वारीसाठी किलोमागे ४५ ते ५५ रुपये मोजावे लागत आहेत.
ज्वारीबरोबरच बाजरीच्या दरातही वाढ झाली आहे. पूर्वी किलोमागे ३२ रुपये असलेल्या बाजरीचा दर आता ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेती उत्पादनावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. धान्याची आवक कमी झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्वारी आणि बाजरी ही अनेक कुटुंबांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाची धान्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती वाढल्याने सामान्य ग्राहकांच्या खर्चात भर पडत आहे. उत्पादन आणि पुरवठ्यात सुधारणा होऊन धान्याचे दर कमी होणार का, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.