#

Advertisement

Wednesday, October 21, 2026, October 21, 2026 WIB
Last Updated 2026-10-21T16:30:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिक्षक मतदारयादीत ११ कथित बोगस नावे

Advertisement

 

सोलापूर जिल्ह्यात ११ जणांवर गुन्हा दाखल 

सोलापूर : शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयादीत शिक्षक नसलेल्या ११ व्यक्तींची नावे समाविष्ट झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी या व्यक्ती आपल्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी बार्शीचे गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारांची यादी २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मतदारयादीतील काही नावांबाबत संशय व्यक्त करण्यात आला. यासंदर्भातील माहिती समाजमाध्यमांवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या निर्देशानुसार गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी संबंधित अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली.
मतदार नोंदणीसाठी काही अर्जदारांनी पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील एम. जी. गुरुकुल आणि बार्शी तालुक्यातील ज्योतीबाची वाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती. या प्रमाणपत्रांवर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आणि शाळांचे शिक्के होते. १७ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने संबंधित शाळांकडून लेखी माहिती मागवली. त्यानंतर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी संबंधित व्यक्ती शाळेत कार्यरत नसल्याचे कळवले. दोन्ही शाळांकडून मिळालेल्या माहितीनंतर या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
छत्रपती शिवाजी विद्यालयाशी संबंधित अर्जांमध्ये मोहन बाळासाहेब भोसले, अक्षय श्रीहरी चव्हाण आणि तुषार मोहन भोसले यांची नावे आहेत. तर एम. जी. गुरुकुलशी संबंधित अर्जांमध्ये स्वप्निल अंबरूषी कापसे, रोहित बाबासाहेब कापसे, पृथ्वीराज बाळासाहेब कापसे, शुक्राचार्य शाहुराजे बाबर, सुरज युवराज बाबर, सुदेश नवनाथ कापसे, अभिजीत बापू डिसले आणि संतोषी किशोर धेंडे यांचा समावेश आहे. प्रमाणपत्रांवरील स्वाक्षऱ्या आणि शिक्के खरे आहेत की बनावट, हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि हस्ताक्षरतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.