Advertisement
रोहित पवारांचं आमदार विक्रम पाचपुतेना ओपन चॅलेंज
पुणे: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, गेल्या पाच दिवसांपासून आमदार रोहित पवार हे विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले आहेत. याच आंदोलनादरम्यान रोहित पवार यांनी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर जोरदार टीका करत 2029 च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येणार नाहीत, असा थेट इशारा दिला आहे. सोमवारी पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
काही दिवसांपूर्वी विक्रम पाचपुते यांनी पुण्यातील एमपीएससी आंदोलनावर टीका केली होती. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे राहिले नसून ‘रोहित पवार नाईटस’ कार्यक्रम सुरू असल्यासारखे वाटते, असा टोला त्यांनी लगावला होता. दिवसभर आंदोलनस्थळी केवळ 50 ते 100 लोक असतात आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे, असा दावाही त्यांनी केला होता. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून राज्याला वेठीस धरले जात असून, रोहित पवार हे आंदोलनाच्या आडून ‘अर्बन नक्षल’ तयार करत असल्याचा गंभीर आरोप पाचपुते यांनी केला होता.
या टीकेला उत्तर देताना रोहित पवार यांनी पाचपुतेंचा समाचार घेतला. सामान्य कुटुंबातील, शेतकऱ्यांच्या आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘अर्बन नक्षल’ म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. “तुम्ही माझ्यावर टीका करण्याच्या नादात या विद्यार्थ्यांना अर्बन नक्षल म्हणालात. 2029 मध्ये ही व्यक्ती विधानसभेत जाणार नाही, ही माझी जबाबदारी आहे,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
दरम्यान, रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर विक्रम पाचपुते यांनीही पलटवार केला आहे. रोहित पवारांच्या राजकीय अहंकाराचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ देऊ नये, अशी टीका त्यांनी केली. स्वतःचा राजकीय इगो जपण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनू नये. हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आहे की स्वतःचा इगो जपण्यासाठी, याचा विचार रोहित पवारांनी करावा, असे पाचपुते यांनी म्हटले आहे. रोहित पवारांच्या या आव्हानामुळे आगामी काळात दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
