#

Advertisement

Thursday, November 26, 2026, November 26, 2026 WIB
Last Updated 2026-11-26T09:23:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर? पुण्यात 5 शिक्षक निलंबित

Advertisement

पुणे : दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी सवलती आणि बदलीचा लाभ घेतल्याच्या संशयातून पुणे जिल्हा परिषदेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीत अपंगत्वाचे प्रमाण अत्यंत कमी आढळल्याने जिल्हा परिषदेच्या 5 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. या शिक्षकांच्या जुन्या प्रमाणपत्रांमध्ये 18 ते 60 टक्के अपंगत्व असल्याची नोंद होती. मात्र, नव्याने केलेल्या वैद्यकीय तपासणीत हे प्रमाण 0 ते 10 टक्क्यांपर्यंत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात संबंधित शिक्षकांनी दिव्यांग संवर्गातून बदली मिळवली होती का आणि इतर शासकीय सवलतींचा लाभ घेतला होता का, याची चौकशी सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबत माहिती दिली. फेरतपासणीत तांदळी (ता. शिरूर) येथील कोमल शिरसाट यांचे अपंगत्व 52 टक्क्यांवरून 0 टक्के आढळले. मुटकवाडी येथील अरुणा तांबे यांचे प्रमाण 42 टक्क्यांवरून 1 टक्क्यावर आले. दरस्तुरवाडी येथील मधुकर डोंगरे यांचे 60 टक्क्यांवरून 10 टक्के, शिंगवे येथील सुभाष इंदोरे यांचे 18 टक्क्यांवरून 8 टक्के, तर वडकीनाला येथील वाजीदा शेख यांचे 45 टक्क्यांवरून 0 टक्के नोंदविण्यात आले.
नियमानुसार दिव्यांग संवर्गातील विशेष सवलती मिळवण्यासाठी किमान 40 टक्के अपंगत्व असणे आवश्यक आहे. त्यामुळे या शिक्षकांनी यापूर्वी कोणत्या आधारावर लाभ घेतले, याची पडताळणी केली जात आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील 409 शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रे जोडली होती. त्यानंतर गैरप्रकाराच्या तक्रारी आल्याने पहिल्या टप्प्यात 176 प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 46 प्रमाणपत्रे बोगस आढळली. यातील 41 शिक्षकांचे सेवा-सुविधांशी संबंधित लाभ काढून घेण्यात आले आहेत. आता आणखी 5 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या तपासणीला वेग आला आहे.