Advertisement
ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची माहिती; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक
सोलापूर : शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान शेगाव (जि. बुलढाणा) ते नागपूर असा न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आमदार रोहित पवार शुक्रवारी (दि. २८) सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. यानिमित्ताने पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता डफरीन चौकातील आयएमए हॉल येथे पत्रकार परिषद आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रस्तावित ट्रॅक्टर मोर्चाचे नियोजन, सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय सहभाग, शेतकरी व ट्रॅक्टरची नोंदणी, मोर्चाच्या प्रचार-प्रसिद्धीची रणनीती आणि जास्तीत जास्त शेतकरी व कार्यकर्त्यांचा सहभाग याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
शेतीमालाला योग्य भाव मिळावा, वाढत्या शेतीखर्चाचा प्रश्न मार्गी लागावा, शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा मिळावा, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यांसह ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे नियोजन पक्षाकडून केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, शहराध्यक्ष, युवक, महिला आघाडी तसेच विविध सेलचे पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले आहे. प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर शेतकरी, युवक आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मोर्चातील सहभागाचे नियोजन करावे. तसेच स्थानिक अडचणी व आवश्यक सूचनाही बैठकीत मांडाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. सोलापूर जिल्ह्याचा मोर्चातील सहभाग प्रभावी आणि संघटित असावा, यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
