Advertisement
ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा रोहित पवारांना ठाम पाठिंबा
पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संशयास्पद बाबींवरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर आणि पुण्यातील डेक्कन परिसरात झळकलेल्या ‘अजितदादांच्या अपघातामागे असलेल्यांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण?’ या आशयाच्या पोस्टरमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आमदार रोहित पवार यांना ठाम पाठिंबा दर्शविला आहे.
‘रोहित पवार, तुम्ही संबंधित नेत्याचे नाव जाहीर करा. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष तुमच्या पाठीशी आहे,’ अशी स्पष्ट भूमिका ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मांडली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणात सत्य समोर येणे आवश्यक असून, या प्रकरणातील संशयास्पद बाबींचा उलगडा करण्यासाठी रोहित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांचा विमान अपघात नसून घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. तसेच, या प्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचवणारा ‘मफलरवाला नेता’ कोण, असा सवाल उपस्थित करीत संबंधिताचे नाव जाहीर करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर मुंबई आणि पुण्यात झळकलेल्या पोस्टरमुळे या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे.
पोस्टरवर मफलरची प्रतिकृती छापण्यात आली असून, कोणत्याही नेत्याचे नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे या पोस्टरमागील नेमका उद्देश आणि संबंधित नेत्याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, पोस्टरमागे रोहित पवार यांची भूमिका असल्याच्या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते संबंधित नेत्याचे नाव जाहीर करणार का, तसेच अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवे पुरावे अथवा मुद्दे मांडणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘अजितदादांच्या अपघातामागील सत्य बाहेर आले पाहिजे. रोहित पवार यांनी नाव जाहीर करावे, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,’ या भूमिकेतून ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी पक्षाची एकजूट अधोरेखित केली आहे. त्यामुळे आगामी पत्रकार परिषद आणि त्यातून होणाऱ्या संभाव्य खुलाशांकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात आहे.
