Advertisement
कंठ दाटून आला, ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…
पुणे : दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात अनावरण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर हा सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या. सभेला संबोधित करताना त्या अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, आजचा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे. ज्या पुणे जिल्हा परिषदेवर आदरणीय दादांनी मनापासून आणि जीवापाड प्रेम केले, ज्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, आज त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप मोठी आणि अत्यंत भावुक करणारी गोष्ट आहे. दादांच्या आठवणी सांगताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. यावेळी त्यांनी, “दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू, असे भावुक उद्गार काढले.
