#

Advertisement

Tuesday, November 24, 2026, November 24, 2026 WIB
Last Updated 2026-11-24T12:28:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीचे नेते देवराम लांडेंची ऑडिओ क्लीप आणि व्हिडिओ व्हायरल

Advertisement

१० कोटींच्या बदल्यात आदिवासींची जमीन देण्याचा दावा

पुणे : दहा कोटी रुपयांच्या बदल्यात कंपनीला आदिवासींची जमीन मिळवून देण्याचा दावा केल्याचा आरोप झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. लांडे आणि त्यांचे पुत्र अमोल लांडे हे कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीशी बोलणी करत असल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. याशिवाय, या प्रकरणातील स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओही समोर आला असून, त्यामध्ये दोनशे रुपयांच्या नोटेचे दोन तुकडे करून त्यांची देवाणघेवाण झाल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये दहा कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ही रक्कम हवाला मार्गाने स्वीकारण्याबाबत बोलणी झाल्याचा आरोप आहे. तसेच, प्रकल्पाबाबत बातम्या देणाऱ्या स्थानिक पत्रकारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांनाही कंपनीच्या बाजूने वळवून घेण्याचा दावा लांडे यांनी संभाषणात केल्याचे समोर आले आहे. याच संभाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचाही आरोप आहे.
देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी २०२४ मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती.देवराम लांडे यांच्या सूनबाई जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांमध्ये देवराम लांडे आघाडीवर होते. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात टोरंट कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पालाही त्यांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता कंपनीला जमीन मिळवून देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याचा आरोप समोर आल्याने जुन्नर तालुक्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, लांडे यांनी आपली बाजू मांडताना संबंधित व्यक्तीने आपल्याला फोन करून दहा कोटी रुपयांचे आमिष दाखवले होते, असा दावा केला आहे. त्या व्यक्तीला पुराव्यांसह पकडून देण्यासाठीच आपण त्याच्याशी बोलत होतो, असेही त्यांनी सांगितले आहे. कंपनीचा अधिकारी म्हणून लांडेंशी बोलणारी व्यक्ती जुन्नर तालुक्यातीलच स्थानिक असल्याची चर्चा आहे. लांडे यांचे कथित संभाषण समोर आल्यानंतर त्यात स्थानिक पत्रकारांची बदनामी झाल्याचा आरोप करत काही पत्रकारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसरीकडे, देवराम लांडे यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.