#

Advertisement

Tuesday, November 24, 2026, November 24, 2026 WIB
Last Updated 2026-11-24T12:32:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

चंद्रकांत पाटलांसाठी वेगळे निकष का?

Advertisement

शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आक्रमक

पुणे : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो प्रकरण उघडकीस आल्यानंतर समोर आले होते. खरातच्या संस्थेशी रूपाली चाकणकर यांचे संबंध असल्याचा मुद्दाही चर्चेत आला होता. या प्रकरणात चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत वेगळे निकष का, असा सवाल शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.
धंगेकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आहे. त्यांनी चंद्रकांत पाटील आणि अशोक खरात यांचा एकत्रित फोटो शेअर केला असून, या छायाचित्राचा संदर्भ देत पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, केवळ छायाचित्रावरून संबंधित व्यक्तींमधील संबंध किंवा त्यांचा हेतू निश्चित करता येत नाही.
धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खरात प्रकरणात त्याच्यासाठी छत्री धरल्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का, असा सवाल त्यांनी केला आहे.
न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होता कामा नये. चाकणकर यांच्याबाबतीत जे निकष लावण्यात आले, तेच पाटील यांच्याबाबतीतही लावले पाहिजेत, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. तसेच, ‘चंद्रकांतदादांसाठी खरातबाबाने वेगळे टेबल मांडले होते का?’ असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. खरात प्रकरणात चाकणकर यांच्या भूमिकेवरून यापूर्वीही विरोधकांनी सरकारला घेरले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतरही या प्रकरणातील राजकीय जबाबदारीचा मुद्दा चर्चेत राहिला. आता चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या छायाचित्राचा मुद्दा पुढे करत धंगेकर यांनी सरकारच्या निर्णयप्रक्रियेतील कथित दुहेरी निकषांवर प्रश्न उपस्थित केला आहे.