Advertisement
पुणे महापालिकेच्या धडाकेबाज कारवाईचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक
पुणे : पुणे शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत होर्डिंगविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले असून, बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यांमध्ये आपले नावही आले, तर ते पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट करण्याची सूचना त्यांनी विनोदी शैलीत केली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची नावेही जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत पुणे महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. शहरातील रस्ते, पदपथ आणि पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठीही पुरेशी जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे. नियम केवळ सरकारी दस्तावेजांमध्ये ठेवण्यासाठी नसतात, तर त्यांचे पालनही झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
बेकायदा होर्डिंगची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून देशभरातील अनेक शहरांमध्ये ती दिसून येते. त्यामुळे अशा फलकांवर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई होणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेने या समस्येवर उपाय म्हणून स्वीकारलेली अभिनव आणि ‘पुणेरी’ पद्धतीची मोहीम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आगामी काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी आणि शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. नेते असोत किंवा कार्यकर्ते, त्यांनी जनतेमध्ये दिसले पाहिजे; बेकायदा होर्डिंगवर नाही, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला.
