Advertisement
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिंदेची भेट घेतलेल्या या खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे, भावना गवळी, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे यांच्यासह 12 खासदारांचा समावेश आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांना भेटण्याआधी या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद पदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले. भावना गवळी या शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद म्हणून कायम असल्याचं म्हटलं आहे. पण शिवसेनेनं आधीच भावना गवळी यांची हकालपट्टी केली आहे.
