Advertisement
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेना गटाच्या याचिकेवर निवडणूक आयोगाच्या कारवाईविरुद्ध उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
शिंदे गटाने आपल्यालाच असली शिवसेना म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मंगळवारी उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठाकडे निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीमुळे या प्रकरणाची सुनावणी प्रभावित होईल, असा दावा सिब्बल यांनी केला आहे.
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सुप्रीम कोर्टात आधीच सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीवेळी या याचिकेवरही सुनावणी घेतली जाईल, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे 1 ऑगस्टला सरकारचं भवितव्य तसंच शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाबाबत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
