Advertisement
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नवं सरकार स्थापन होवून आतापर्यंत दोन आठवडे झाले. पण या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी ठरेल? हा प्रश्नच आहे. सरकार स्थापन होवून 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही म्हणून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चढाओढ सुरु असल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहेत. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असल्या तरी अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 20 जुलैला बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा मंत्री शपथ घेतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल. यापैकी पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा 20 जुलैपासून सुरु होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
