Advertisement
पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे अशा धोकादायक ठिकाणी पर्यटनास 17 जुलैपर्यंत बंदी आणली आहे. या परिसरात 17 जुलैपर्यंत कलम 144 लागू असेल. तसेच पुणे जिल्ह्यातील पाच तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमधील शाळांना 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात 14 आणि 15 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील 12वी पर्यंतच्या सर्व शाळांना 14 जुलै ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
