Advertisement
मुंबई : एकीकडे राज्यात सत्तांतर होऊन, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिघांची सत्ता गेली असताना, व राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाची पडझड होत असताना, दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘उपरा’ कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी लक्ष्मण माने यांच्यासमवेत विलास माने, नारायण जावलीकर, शारदाताई खोमणे, अशोकराव जाधव यांच्यासह १८ जणांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार राजेश टोपे, आमदार बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.
