Advertisement
मुंबई : शिवसेनेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी पत्र लिहून शिवसेनेबद्दल आपली नाराजीही बोलून दाखवली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. कदम यांनी एक पत्र लिहून आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर निधनानंतर शिवसेना नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी टीका कदम यांनी केली. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझ्या मुलगा आमदार योगेश कदम याला अपमानीत करण्यात आले आहे, अशी टीकाही कदम यांनी केली. विधानसभेच्या निवडणुकीआधी मला अचानक मातोश्रीवर बोलावून घेतले आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले, मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. कुठलेही वक्तव्य करायचे नाही. याचे कारण अजूनही मला कळू शकले नाही. मागील 3 वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्याचा मार मी सहन करत आहे, अशी नाराजीही कदम यांनी बोलून दाखवली.
