Advertisement
पुणे : धर्मांधता वाढेल, ती रुजविली जाईल अशा पद्धतीने काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मांडणी केली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान, लिखाण याचा विचार केला असता, त्यांच्या इतका अन्याय शिवाजी महाराज यांच्यावर कोणीच केला नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे लिखीत शिवचरित्र आणि विचार प्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोतल होते. पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, पी.एच.डी.चे मार्गदर्शक डॉ. पी. डी. जगताप, राजकुमार घोगरे, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रशेखर शिखरे उपस्थित होते.
‘‘ छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेक लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अनेक ग्रंथ, पुस्तके निघाली. त्यातील काही माझ्या वाचनात आली. इंग्लिश लेखक ग्रॅंड डप यांनी शिवाजी महाराजांवर चार ग्रंथ िलहीले. या ग्रंथाचे खंड मला लंडन येथे मिळाले. या खंडात त्या काळातील सत्याचा उल्लेख असल्याचे मला जाणवले. महाराष्ट्रातही अनेक पुस्तके, ग्रंथ शिवाजी महाराजांवर प्रकाशित झाले. त्याच्या हजारो प्रति महाराष्ट्रात निघाल्या, काहींनी त्या घरात ठेवल्या. बाबासाहे बपुरंदरे यांची व्याख्याने, लिखाणाचा विचार केला तर शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका कोणीच अपमान केला नाही. शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या लेखानात अशी मांडणी काही घटकांनी केली. परंतु ती मांडणी सत्यावर विश्वास असणाऱ्यांना मान्य होणार नाही’’ असे पवार यांनी नमूद केले.
