Advertisement
सोलापूर जिल्हा आणि मंगळवेढा तालुक्यात चर्चेला उधाण
मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यात ज्याची सहकारावर पकड त्याचे राजकारणात वर्चस्व अशी सर्व साधारण धारणा आहे. त्यातही साखर कारखाना ताब्यात असणे म्हणजे एक गठ्ठा मतदान. कारखान्याच्या सभासदांच्या जीवावर आमदार, खासदार झाल्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत. पण, याच शेतकरी सभासदांच्या जीवावर उठणाऱ्यांची माती होते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर होऊन समविचारी गटाच्या ताब्यात कारखाना आला आहे. विशेष म्हणजे या कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान आमदारांना पराभवाला समोरे जावे लागले आहे. यामागे समविचारी गटाची ताकद असली तरी सत्ताधारी गटासह आमदारांना अशी कोणती चूक भोवली, अशी चर्चाही आता मंगळवेढा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुरू झाली आहे.श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याभोवती मंगळवेढा मतदार संघाचे राजकारण फिरते. त्यामुळे हा कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी गटाने मोठी तयारी केली होती. यासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासूनच गावभेटी, दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी सभासद असलेल्या गावागावात जाऊन घोंगडी बैठकाही घेतल्या गेल्या. याशिवाय सोशल मिडियावरही सत्ताधारी गट खूप सक्रीय होता. यातून सत्ताधारी गटच निवडणूक जिंकणार, असे वातावरण तयार करण्यात आले होते. यामुळे सत्ताधारी गटाकडून निवडणूक लढण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्या होत्या. सत्ताधारी गटाच्या बाजुने आमदार असल्याने या गटाला निवडणूक सोपी जाणार असे चित्र रंगवण्यात आले होते. शेतकरी सभासदांना मोठी आश्वासने दिली गेली होती. परंतु, त्याच दरम्यान कारखान्यातील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न, निवृत्त कर्मचाऱ्यांची रखडलेली पेन्शन आणि देणी यासारख्या मुद्यांवर कामगारांनी संप पुकारलेला असताना सत्ताधारी गटाला येथेच "खो' बसला. त्यातच, समविचारी गटाच्या उमेदवारांनी केवळ आणि केवळ कारखान्याच्या प्रगतीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठीची निर्णयांवर भर दिला. आपली भूमिका शेतकरी सभासदांपर्यंत पोहचविण्यात समविचार गटाचे उमेदवार यशस्वी झाले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जी काही पोकळ आश्वासने दिली गेली ती पूर्ण फिकी पडली.
सत्ताधारी गटाला अशाही स्थितीत आपण निवडणूक जिंकणार असा विश्वास होता. तर, आमदारांसह या गटातील अनेकांना पराभवाची धाकधुकही होती. यामागची कारणं आता चर्चेत येऊ लागली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गतवर्षीच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चित करताना माजी आमदार परिचारक यांच्या समर्थकाला उमेदवारी देताना काही निष्ठावंतांना वगळले गेले होते, अशातच स्व. आमदार भालके यांच्या तोंडून हुलजंती येथे प्रचारसभेत गेलेले शब्दाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तर, भूमिपुत्रांचा मुद्दा अधिक प्रभावीपणे चर्चेला गेल्याने भालके गटाचा निसटता पराभव झाला. त्यात आमदारांकड सत्ता चालत आली. परंतु, त्यानंतर सहकारातील ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे हे बाजूला झाले. धनश्री परिवारांचे शिवाजीराव काळुंगे यांची भूमिका गुलदस्तात राहिली. माजी अध्यक्ष ऍड. नंदकुमार पवार हे सुद्धा यापासून काही लांबच होते. त्यामुळे सत्ताधारी गट वरवर भक्कम दिसत होता. आतून मात्र पोकळ वासा असल्याचे शेतकरी सभासदांच्या निदर्शनास आले होते. त्यातच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या घरातील पराभवाची सल ढोबळे गटात कायम होती. शाहू परिवाराचा मोठा दणका या निवडणुकीत बसला असल्याचेही मानले जात आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे हे स्थिर राहिले होते, त्यानंतरही शाहू परिवाराने जे काम करायचे ते केलेच. याच कारणातून आमदारकी असल्यामुळे कारखान्याची निवडणूक सहज शक्य होईल, असा होरा सत्ताधारी गटांला पराभवाच्या खाईत घेऊन गेला. तर, समविचारी गट एकसंधपणे लढला.