Advertisement
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. नवं सरकार स्थापन होवून 15 दिवस उलटून गेले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव्या सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त दोन मंत्री सध्या निर्णय घेताना दिसत आहेत. पण त्यांनी घेतलेले निर्णय अवैध असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A चा दाखला देत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रश्न विचारला आहे. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव असा करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नवी मुंबईत उभारलं जाणाऱ्या नव्या विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. पण हे सर्व निर्णय राज्यपाल यांचं बहुमत सिद्ध करण्याची नोटीस आल्यानंतर घेतले गेले होते. त्यामुळे ते वैध नाहीत, असा दावा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात होता. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या सरकारच्या कॅबिनेटमधले सर्व निर्णय रद्द केले. त्यानंतर आज घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तेच निर्णय घेतले. पण त्यांच्या या मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयांवर शिवसेनेचे संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
