Advertisement
पंढरपूर : गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला, या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. आषाढी यात्रा सोहळ्याची काल्याने सांगता झाली.
गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून श्रीकृष्ण मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रध्देने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप केले जात होते. गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन पालख्या आपापल्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या. तत्पूर्वी मंदीर समितीच्यावतीने मंदीर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, संभाजी शिंदे, ॲड.माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, कार्यकारी अधिकारी गजाननन गुरव यांनी पादुकांचे पुजन व मानाच्या पालख्यांचे मानकरी यांचे उपरणे,श्रीफळ व हार देवून सत्कार केला. यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.