Advertisement
औरंगाबाद : शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे कालपर्यंत टीईटी परीक्षा घोटाळ्यामुळे प्रकाशात आले होते. आजही ते प्रचंड चर्चेत आहेत ते मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळवल्याने...सत्तार हे बेधडक राजकारण करतात आणि त्यांना सतत यशही मिळत जातं. आता सत्तारांना मंत्रिपद मिळाले आहे. विशेष म्हणजे, सत्तारांची थेट कॅबिनेटमध्ये बढती मिळाली आहे.
अब्दुल सत्तार असे राजकारणी आहेत जे "होनी को अनहोनी कर दे...अनहोनी को होनी" करू शकतात याचा प्रत्यय महाराष्ट्राला गेल्या 24 तासात आला. रात्री उशिरापर्यंत त्यांना मंत्रिपद मिळणार नाही असे चित्र होते. टीईटी घोटाळ्यात त्यांचे नाव उचलले गेल्याने त्यांच्या मंत्रिपदाच्या अपेक्षा मावळल्या होत्या. शिक्षण उप संचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी अब्दुल सत्तार यांना क्लिन चिट दिली. त्यामुळे सत्तार रात्री 3 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांना शिक्षण विभागाचे क्लीन चिट दिल्याचे पत्र घेऊन भेटले आणि त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलेच. टीईटी परीक्षा घोटाळ्यामध्ये आपल्याला औरंगाबाद येथील नेत्यानेच गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय सत्तार यांना आहे. मंत्रिमंडळात स्थान असल्याची जोरदार चर्चा असतांना संजय शिरसाट यांना मात्र शपथ घेता आली नाही. मात्र ते नाराज नसल्याचे सांगत आहेत. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाल्याने औरंगाबादच्या राजकारणाचे बरेच चित्र बदलणार आहे. सर्वप्रथम सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यात राजकीय संघर्ष अटळ आहे. सिल्लोड ला खेटून असलेले फुलंब्री गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदार संघावर सत्तरांचे चांगले वर्चस्व आहे.
