Advertisement
निगडी येथील कार्यक्रमात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन
पिंपरी/निगडी : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचा आज जन्मदिवस हा दिवस म्हणजे त्यांचे आयुष्य जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष याची प्रचिती देणारा आहे. त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणा देणारा आहे, यातून त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगत घराघरात त्यांच्या फोटो सोबतच त्यांचे विचारही पोहचवायला हवेत, असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती बहुजन रयत परिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. निगडी येथील अण्णा भाऊंच्या पुतळ्याला बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह "शब्दप्रभू' लक्ष्मणराव ढोबळे तसेच महिला प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंखे-ढोबळे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, अण्णांची पारंपरिक जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांची जयंतीही साजरी व्हायला हवी. अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव होणे ही माझी आग्रही मागणी आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही ढोबळे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, ढोल-ताशे आणि डिजे वाजवून मिरवणूक काढण्यापेक्षा अण्णाभाऊंची साहित्यिक पुस्तकं वाटून जयंती साजरी करण्याची आज गरज आहे. अण्णांची जयंती साजरी करताना त्यांचा एखादा विचार आत्मसात करा, त्यांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करा, संघटनेमध्ये त्यांचे मानवी कल्याणाच्या विचारांचे बीज पेरा, येणाऱ्या नवीन पिढ्यांना अण्णा भाऊ साठे समजावून सांगा, तेव्हाच खऱ्या अर्थाने अण्णा भाऊ साठेंची जयंती साजरी होईल.

