#

Advertisement

Friday, August 5, 2022, August 05, 2022 WIB
Last Updated 2022-08-05T13:15:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

ग्रामपंचायत निवडणूक ; सोलापुरात उद्धव ठाकरेंचा भाजपला दणका

Advertisement

सोलापूर : राज्यात ठाकरे सरकार कोसळून सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान पार पडले. या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी जाहीर होत आहे. काहीवेळापूर्वीच मतमोजणीला सुरुवात झाली असून ग्रामपंचायत निवडणुकांमधील प्राथमिक कल हाती आले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. याठिकाणी शिवसेनेच्या 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मनगोळी ग्रामपंचायतीमध्येही भाजपच्या सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. मनगोळी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सुभाष देशमुख गटाची सत्ता होती. मात्र, यंदा मनगोळी ग्रामपंचायतीमध्ये सहापैकी केवळ एका जागेवरच सुभाष देशमुख पॅनलचा उमेदवार विजयी झाला. माढा तालुक्‍यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीवर आमदार बबनराव शिंदे समर्थक तथा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ यांच्या गटाची सत्ता कायम राहिली आहे. तर दुसरीकडे मात्र पडसाळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रताप पाटील यांच्या गटाचा पराभव झाला आहे.