Advertisement
मुंबई : शिंदे-फडणवीस गटाकडून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितलं जातंय. या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागणार हा चर्चेचा मुद्दा आहे. या विस्तारावरुन सध्या गुजरात पॅटर्नची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या गुजरात पॅटर्नने भाजपच्या गोटातील अनेक बड्या नेत्यांना धडकी भरली आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या अनेक माजी मंत्र्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दिल्लीला गेले होते. फडणवीस यांनी दिल्लीत जावून भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाली. पण मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी द्यावं, यावर पक्षश्रेष्ठींसोबत एकमत होत नव्हतं, अशी चर्चा आहे.
पक्षश्रेष्ठींना महाराष्ट्रात आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पॅटर्न अवलंब करायचा आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पण गुजरात पॅटर्ननुसार सर्वच नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर राज्य कारभार करण्यास पुढे अडचणी येऊ शकतील. त्यामुळे काही नवे चहरे आणि काही जुने चेहरे यांच्यातील समन्वय साधून विस्तार करण्यात यावा, अशी फडणवीसांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांसकडून मिळाली आहे.
गुजरात पॅटर्न म्हणजे नेमकं काय?
गुजरात पॅटर्न म्हणजे गेल्यावर्षी (2021 मध्ये) गुजरात राज्यात मोठी राजकीय खांदेपालट करण्यात आली होती. भाजपने भूपेश पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व जुन्या मंत्र्यांना नारळ दिला होता आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. महाराष्ट्रात तसं काही घडण्याची शक्यता कमी आहे. पण भाजप सर्व जुन्या चेहऱ्यांना 100 टक्के नारळ देणार नसली तरी कमीत कमी 60 टक्के जुन्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळातून वळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
