Advertisement
कोल्हापूर : राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर राज्यासह जिल्ह्यांतील राजकारणाची दिशा बदलू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपचे पारडे जड दिसत आहे. राज्यसभेवर नुकतेच निवडून गेलेले खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील पारंपरिक असलेले विरोधक सतेज पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. यामुळे जिल्हा बँक आणि गोकुळच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली आहे. खासदार महाडिक यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री मुश्रीफांनी त्यांना उत्तर दिले आहे.
गोकुळमध्ये सत्ता बदलाचा दावा करणारे खा. महाडिक यांना गोकुळमध्ये मी देखील असल्याचा विसर पडला असावा. महाडिक यांची भेट होईल तेव्हा आपण खासगीत दोन्हीही संस्थांच्या आर्थिक प्रगती आणि सभासदाभिमुख कारभाराबाबत समजावून सांगू त्यानंतर ते गोकुळच्या सत्तांतराबाबत यापुढे कधीच उल्लेख करणार नाहीत, असे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे. जिल्हा बँक व गोकुळमधील सत्तांतर अशक्य असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील सत्तांतरानंतर गोकुळसह अन्य सहकारी संस्थांमध्ये सत्ताबदल होईल, असा दावा महाडिक करत आहेत. यासंदर्भात विचारले असता मुश्रीफ म्हणाले, महाडिक यांनी गोकुळमधील सत्ताबदलाचा दावा आ. सतेज पाटील यांना नजरेसमोर ठेवून केला असावा. परंतु, गोकुळ व जिल्हा बँक या दोन्हीही संस्थांच्या सत्तांमध्ये हसन मुश्रीफ हा सुद्धा एक घटक आहे, हे कदाचित ते विसरले असतील.
