Advertisement
मुंबई : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविका आघाडी सरकार कोसळलं. यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विरोधी नेतेपक्षाची जबाबदारी दिली गेली. मात्र, अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत.
पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून गृह, वित्त, ग्रामीण विकास यासह अनेक मंत्रालयांचं नेतृत्व केलं आहे. विधीमंडळ पक्षाचे गटनेते असलेले पाटील हे या निर्णयामुळे इतके नाराज होते, की त्यांनी अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचे पत्र सभापतींना देण्यास नकार दिला, असं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितलं.
मात्र, जयंत पाटील यांनी या निर्णयावर नाराज असल्याचे औपचारिकपणे नाकारले आहे आणि ते त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही खोडून काढली आहे. मात्र त्यांनी कबूल केलं की मला विरोधी पक्षनेते व्हायचं आहे, परंतु त्याचवेळी अजित पवार यांना या पदावर नियुक्त करण्याच्या निर्णयास मी स्वतःही पाठींबा दिल्याचंही ते म्हणाले.
