Advertisement
मुंबई : स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात सोमवारी दुपारी शिवसेनेतर्फे महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. पाटील यांच्या निषेधाचे लिहिलेले फलक जाळून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांच्या निषेधाचे फलकही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून टाकले. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला आघाडीच्या मंगला पाटील, मनिषा पाटील, युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडिया,अमित जगताप यांच्यासह शिवसैनिकांचा आंदोलनात समावेश होता. रविवारी जळगाव शहरात झालेल्या जाहीर कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी डॉक्टरांचे डोके एका फॅकल्टीचे असते. आम्ही जनरल फिजीशियन आहोत. एक हजार जणांची ओपीडीचा निकाल दोन तासात लावला. मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे आहेत.स्त्रिरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होवू शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबाबत प्रतिक्रया उमटत आहेत. सोमवारी दुपारी शिवसेनेतर्फे मनपासमोर मंत्री पाटील यांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. गुलाबराव यांच्या फोटोवर फुली मारलेले निषेधाचे फलक शिवसैनिक घेऊन आले होते.
