Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पण, वेळीच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यानंतरही चंद्रकांत पाटील या तरुणाची साधी विचारपूस न करताच निघून गेले.
कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यांच्यासमोरच ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. परशुराम नामदेव कांबळे असं या तरुणाचं नाव आहे. त्याने जिल्हाधिकारी दालनासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपाखाली नोकरी मिळण्याची मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने, परशुराम कांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण, तिथे हजर असलेल्या पोलिसांनी लगेच झडप घालून त्याला रोखले. मात्र, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच घटना घडूनही पाटील यांनी आत्मदहन करणाऱ्या परशुराम कांबळे या तरुणाची साधी विचारपुसही केली नाही.
