Advertisement
मुंबई : आपल्या लढ्याला यश... शासकीय नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर माझे उपोषण सोडविताना दिलेले आश्वासन पाळले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन! असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हणले आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यादरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे आभार मानले आहेत. आपल्या लढ्याला यश आल्याचेही राजेंनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कोरोना महामारीमुळे शासनाने नियुक्तीपत्रे देण्यास विलंब केला व दरम्यान 9 सप्टेंबर 2020 रोजी दुर्दैवाने मराठा आरक्षणास स्थगिती आली. त्यामुळे नंतरच्या काळातही शासनाने या उमेदवारांना नियुक्ती दिली नाही.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अधिसंख्य जागा निर्माण करून मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्व उमेदवार व समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेसह महाराष्ट्र विधीमंडळ व राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन!
