Advertisement
मुंबई : महाराष्ट्रामध्ये शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन एका महिन्यापेक्षा जास्तचा काळ लोटला आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंच राज्याचा कारभार हाकत आहेत. या दोघांकडून मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असं सांगण्यात येत आहे, पण याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवारपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितलं होतं, त्यानंतर आता केसरकरांनी याबाबत आणखी एक वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील, तेव्हाच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मला ज्याप्रमाणे वरिष्ठ सांगतात, ती माहिती मी देतो. मी कुठलाही निर्णय घेत नाही, त्याच धर्तीवर चार दिवसांमध्ये विस्तार होईल, असं सांगितल्याचं केसरकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आज त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत. याबाबतही केसरकर यांना विचारण्यात आलं. ज्या अर्थी दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत, त्याअर्थी यादी फायनल झाल्याचं म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली आहे.
