Advertisement
सोलापूर : माजी मंत्री शिवसेना नेते दिलीप सोपल यांच्यावर ईडीची चौकशी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं धक्कादायक वक्तव्य भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी केलं आहे. अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी थेट शिवसेना नेते दिलीप सोपल यांना ईडीची धमकी दिली आहे. या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. ईडीच्या चौकशीपूर्वी भाजप नेत्यांना याबाबत कशी माहिती मिळते, याबाबत महाविकास आघाडीकडून सवाल उपस्थित केला जात आहे.
दिलीप सोपल यांचा आर्यन नावाचा साखर कारखाना आहे. या कारखान्याची एफआरपीची बिले थकीत आहेत. काही दिवसापूर्वी दिलीप सोपल यांनी आर्यन कारखान्याची संबंध नसल्याचे वक्तव्य केले होते. यावरूनच आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेना नेते सोपल यांना ईडीची लावण्याची धमकी दिली. ईडी कार्यालयात माजी मंत्री सोपल याच्याविरोधात तक्रार पुढील आठवड्यात देणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे.
