Advertisement
मुंबई : पत्रा चाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी इडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. इडीच्या कस्टडीमध्ये असलेल्या संजय राऊत यांनी विरोधकांना पत्र लिहून आपल्याला पाठिंबा दिल्याबाबत धन्यवाद दिले आहेत. शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी संजय राऊत यांच्या सहीचं एक पत्र प्रसिद्ध केलं.
संजय राऊत यांनी या पत्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आप, सीपीआय आणि सीपीआय-एम या विरोधी पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत. तुमचा विश्वासू सहकारी कोण हे कठीण काळातच दिसतं, असं संजय राऊत विरोधकांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत.
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार असलेल्या संजय राऊत यांना इडीने 1 ऑगस्टला अटक केली. मुंबईच्या गोरेगाव परिसरात असलेल्या पत्रा चाळ रिडेव्हलपमेंटमध्ये घोटाळा झाला असून यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आणि यातून संजय राऊतांना फायदा झाल्याचा इडीचा आरोप आहे. गुरूवारी संजय राऊत यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
