Advertisement
कोल्हापूर : शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे पुढे आली आहेत. याकडे आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी मंत्रिमंडळात सत्तार यांना शिक्षण मंत्री करायला हवे, असा टोला पत्रकार परिषदेत लगावला.
पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या कामगिरीवर टीका केली. ते म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांची वाताहात झाली आहे. तशी अवस्था भारतात निर्माण होत आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू झाली आहे. उदारमतवाद शिल्लक राहणार का असा प्रश्न निर्माण झाला असून लोकशाही धोक्यात आली आहे.
विरोधक संपवून टाकण्याची भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलून दाखवत आहेत. ईडी, सीबीआय अशा संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात आहे. देशातील जनता सुज्ञ होऊन अशा प्रकाराविरुद्ध आवाज उठवला नाही तर विरोधकांचे अस्तित्व संपून जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
