Advertisement
मुंबई : एकनाथ शिंदे-भाजप युतीला दोन महिने होत नाहीत तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या वादाचं कारण ठरलंय भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य.
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघात रविवारी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. दहीहंडीच्या या कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार भाजपचा असेल, असं वक्तव्य केलं होतं. बावनकुळेंचं हे वक्तव्य म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत असल्याचंही बोललं गेलं.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीचे माजी खासदार आणि शिंदे गटात गेलेले शिवसेना नेते आनंदराव अडसूळ चांगलेच नाराज झाले आहेत. राज्यात युती टिकवायची असेल तर भाजपने संयम ठेवून बोलावे. अमरावती बुलढाणा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, त्यामुळे आमदार आणि खासदार भाजपचा म्हणणं चुकीचं आहे. आम्ही सोबत आहोत याचं भान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठेवावं, असं आनंदराव अडसूळ म्हणाले, तसंच बावनकुळे यांच्या वक्तव्याची आपण फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही आनंदराव अडसूळ यांनी सांगितलं.
