Advertisement
मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला एक महिन्यापेक्षा जास्तचा काळ झाला आहे, पण राज्यात अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. शिंदे आणि फडणवीस लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगत असले तरी विस्तार का रखडला आहे? याबाबत आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून काहीही सांगण्यात येत नव्हतं.
कोणाला किती मंत्रिपदं द्यायची? दोन्ही पक्ष आणि अपक्षांसाठीचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला काय? यावरून विस्तार रखडल्याचं बोललं जात होतं. पण आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं खरं कारण सांगितलं आहे. पक्षांतर्गत लोकशाही असावी की नाही हे सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून समजेल. विस्ताराला वेळ लागला तरी चालेल, पण सुप्रीम कोर्टाचा आदर राखणं गरजेचं आहे आणि तो आमच्याकडून राखला जात आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. सोमवारी अंतरिम आदेश येईल आणि त्यानंतर विस्तार होईल, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे.
