Advertisement
जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव याठिकाणी श्रीजी जिनिंग आहे. तिथे आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. याच कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले होते. जळगावमध्ये मंत्री गुलाबाराव पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहेत. तर शिवसेना नेते सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. राज्यात ठाकरे आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशात याठिकाणी हे दोन्ही गट एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. धरणगावातली श्रीजी जिनिंग ही शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मालकीची आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. त्यांच्याच जिनिंगमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे याठिकाणी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील येतील का, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गटाचे नेते सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे आणि त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
