Advertisement
मंगळवेढा : मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला समुपदेशन केंद्राकडून १ जानेवारी ते १५ ऑगस्ट या दरम्यान दाखल झालेल्या २०५ प्रकरणात पती-पत्नीमध्ये समझोता करण्यात यश आल्याने विस्कळीत झालेले संसार पुन्हा नव्या जोमाने उभारले आहेत. मंगळवेढा पोलीस ठाण्यात महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने महिला समुपदेशन केंद्र चालवले जाते. या केंद्रात १ जानेवारी ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत एकूण २०५ प्रकरणे दाखल करण्यात आली होती. ही सर्व प्रकरणे समझोता करून मोडकळीस आलेले संसार पुन्हा नव्याने उभे करण्यात या केंद्रातील समुपदेशक विभावरी कसबे व वैशाली गायकवाड यांना यश आले आहे. समुपदेशन केंद्राने दि.१६ जून रोजी वन विभागात काम करणाऱ्या एका शासकीय कर्मचाऱ्याचा पुर्नविवाह लावून दिल्याने मोडलेला संसार पुन्हा नव्या जाेमाने उभा राहून जीवनात संसाराची घडी बसली आहे. सिद्धापूर, अकलूज, शिरनांदगी, सांगली, हिवरगाव येथील विधवांचा पुर्नविवाह ही लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलीस ठाण्यात समुपदेशन केंद्र उघडल्याने यांच्या तक्रारीची समझोता केली जात असल्याने पोलीस ठाण्याकडील गुन्हे दाखल होण्याची प्रमाण सध्या घटले आहे.
