Advertisement
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास शिंदे सरकारचे आरोग्यमंत्री असमर्थ ठरल्याचे समोर आले आहे. आरोग्यमंत्र्यांकडे परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की आली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचं उत्तर आता सरकारकडून सोमवारी दिलं जाणार आहे. अजित पवार यांनी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिंबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला.
