Advertisement
मुंबई : रोहित पवारशी माझे बोलणे झाले असून अद्याप त्यांना कोणती ईडी नोटीस आलेली नाही किंवा चौकशीही सुरू झालेली नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर तर्फे इंधन दरवाढ, महागाई विरोधात पुण्यातील कोथरुड परिसरात जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, आम्हाला कधी कोणत्या तपास यंत्रणेची नोटीस आली तर आमची सदैव भूमिका सहकार्याची राहिली आहे. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आम्हाला कोणती गोष्ट लपविण्याची गरज नाही. आम्हाला अशाप्रकारे काही नोटीस आल्या, तर त्यास आम्ही उत्तर देऊ.
चांदणी चौकातील कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. मात्र, त्याठिकाणचा पूल पाडल्यानंतर सर्व प्रश्न तातडीने मार्गी लागतील की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांचे ही मला याबाबत फोन आले आहे. हा पूल तातडीने पाडणे योग्य की अयोग्य…त्यामुळे याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे केले आहे. पूल पाडण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा परंतु पर्यायी मार्गाचा विचार आणि नियोजन करू कारवाई करण्यात यावी. पूल पाडून नागरिकांची आणखी अडचण होता कामा नये. सर्वांचा विचार करुन तांत्रिक मुद्दे लक्षात घेऊन एकदाच योग्य निर्णय घेण्यात यावा, असे सुळे यांनी सांगितले.
