Advertisement
मुंबई : महाविकासआघाडीचं सरकार गेलं तरी तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरूच आहे. शिवसेनेने इतर पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. यावरून काँग्रेसने शिवसेनेवर टीका केली, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'शिवसेनेने इतर दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर अधिक चांगलं दिसलं असतं, पण तशी काही चर्चा आमच्यात झाली नाही. अजित पवारांना विरोधी पक्षनेता करताना राष्ट्रवादीने काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा केली होती. ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त आहे, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो, ही पूर्वीपासूनची परंपरा आहे. पण इतरांचा पाठिंबा घ्यायचा प्रयत्न विरोधी पक्षनेता नेहमीच करतो', असं जयंत पाटील म्हणाले. विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 आणि काँग्रेसचे 10 आमदार आहेत. यातल्या उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिला असला तरीही अजून विधिमंडळाच्या वेबसाईटवर अजूनही उद्धव ठाकरे आमदार असल्याचं दिसत आहे.
