Advertisement
मुंबई : शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा रंगली होती. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा कोणताही आमचा प्रस्ताव नाही असं सांगितलं असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनी देऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट पडल्यानंतर यंदाचा शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा यंदा कोण घेणार? आणि कुणाला अधिकृत परवानगी मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यासंदर्भात बीएमसीकडे परवानगी मागण्यात आली आहे. मात्र, तशी परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही.
शिवतीर्थावर गेल्या 55 ते 60 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून प्रखरपणे हिंदुत्वाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या विचार ऐकण्यासाठी आमच्यासारखे शिवसैनिक आतुर राहत होते. त्यामुळे आमच्या सारख्या शिवसैनिकांची इच्छा आहे की, जो हिंदुत्वाचे प्रखर विचार देईल, त्याची आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही शिवसेना म्हणून दसऱ्या मेळाव्यासाठी आमच्याकडून परवानगी मागितली नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आणि दादरचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं आहे.
