Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या १२ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. शिंदे आणि भाजपा यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिपद तर राहुल शेवाळे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र्रात महाविकास आघाडीचे सरकार घालवून भाजपची सत्ता आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुढे करण्यात आले होते. त्याबदल्यात शिंदे यांना उपमुख्यमंत्री, त्यांच्यासोबत येणाऱ्या ९ आमदारांना कॅबिनेट मंत्री तर ७ जणांना राज्यमंत्री तसेच केंद्रात दोन मंत्रीपदे देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेत शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले. विधानसभेतील ४० आमदार आणि लोकसभेतील १२ खासदारांना त्यांनी आपल्या बाजूला वळविले. शिवसेना हा एनडीएचाच घटक पक्ष असल्याचा दावा करून या गटाने तसे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. राहुल शेवाळे यांची लोकसभेच्या गटनेतेपदी तर प्रतोद म्हणून भावना गवळी यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते. शिंदे आणि भाजप यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार दक्षिण मध्य मुंबईचे खासदार खासदार राहुल शेवाळे आणि विदर्भातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनाही केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
