Advertisement
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंतायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. राज्यातील तब्बल 18 जिल्ह्यांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. हजारो गावांमध्ये राजकीय रणधुमाळी बघायला मिळणार आहे. त्यामुळे येत्या आगामी काळात प्रत्येक पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.