Advertisement
अकोले : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचडयांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे निर्वादितपणे 28 वर्षांपासून असलेल्या सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीमध्ये पिचडांना मोठा धक्का बसला आहे. आमदारकी, ग्रामपंचायत आणि आता साखर कारखाना निवडणुकीतही मधुकरराव पिचड गटाचा पराभव झाला आहे. पिचड यांच्यासह कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश नवले, माजी संचालकांसह अपक्ष उमेदवाराचा पराभव झाला आहे. मधुकरराव पिचड आणि मुलगा वैभव पिचड यांनाही कारखाना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 21 जागांसाठी होत असलेल्या मतमोजणीत सुरूवातीपासूनच पिचड विरोधी असलेल्या शेतकरी समृद्धी मंडळाने आघाडी घेतली आणि सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळवत कारखान्यावर झेंडा फडकावला आहे.
या निवडणुकीत शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार विद्यमान संचालक अशोक देशमुख, पाटीलबा सावंत आणि खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, म्हाळादेवीचे माजी सरपंच प्रदीप हासे विजयी झाले आहे. एक हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. तर सोसायटी मतदारसंघाच्या निकालामध्ये उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अकोले गटात जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलासराव वाकचौरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिन्नद्र धुमाळ, बुवासाहेब नवले. काँग्रेसच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले विजयी झाले आहेत.
