Advertisement
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले कळकळीचे आवाहन
उमरगा : आपल्या समाजापेक्षा चर्मकार, बौद्ध यासह इतर समाज प्रगती पथावर आहे. काही दुर्लक्षीत समाजानेही त्यांच्या जागा हक्काने पटकावल्या, शिक्षणात प्रगती केली. आपला "मोठा भाऊ' असलेल्या चर्मकार समाजाने तर सर्वांगिण प्रगती करताना सर्वांना मागे टाकले. याचे कौतूक आहे. मी समाजाला पाया पडून कळकळीची विनंती करतो की, आपल्या मातंग समाजानेही एकत्र येणे, मतभेद मिटवणे गरजेचे आहे, असे मोठ्या कळकळीचे आवाहन बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
उमरगा येथे सकल मातंग संघर्ष न्याय समितीतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीचे तसेच मातंग समाज परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. "मातंग समाजाची दशा आणि अपेक्षा' याविषयावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते.शांताई मंगल कार्यालयात तुुडुंब गर्दीत झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी केले होते. यावेळी बहुजन रयत परिषदेच्या महिला अध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे, सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. मच्छींद्र सकटे, उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्यासह मुक बधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.पी.वाघमारे, मानवहितचे सचिन साठे, मुरूचे माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे, सुधाकर बनसोडे, तुळशीराम देडे, संजय कांबळे, रमेश पात्रे, प्रताप रणदिवे, वर्षाताई कांबळे, गोजरबाई बनसोडे, अविनाश शिंदे, राजू शिंदे यांच्यासह विविध समाज संस्थांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी अण्णा भाऊंच्या साहित्याची वैचारिक भूमिका मांडली. रमेश तात्या गालफाडे, ईश्वर क्षिरसागर यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
समाज बांधावांना संबोधित करताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, सोलापूर, अमरावती, पुणे, चेंबूर, दादर, मुंबई या ठिकाणच्या अण्णा भाऊंच्या मानवंदना ज्या पद्धतीने झाल्या तसेच लाखो समाज बांधव अण्णा भाऊंच्या पुतळ्याचे, प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी आले. मोठ्या दिमाखात समाज समुदाय एकत्र दिसला, त्याचे माठे समाधान आहे. मात्र, महाराष्ट्राचा दौरा केला त्यावेळी अनेक ठिकाणी असे लक्षात आले की, अण्णा भाऊंचा पुतळा आहे, जागा आहे पण तो कुठं बसवायचा यावर एकमत होत नाही. यातून पुतळा बसवायचेच राहून गेलं आहे. अमरावती सारख्या ठिकाणी दहा वर्षांपासून पुतळा झाकून ठेवला आहे. हिंगोली, पंढरपूरमध्ये तीच अवस्था आहे. अशी स्थिती का? तर समाजात मतभेद आहेत, यातूनच समाजाचे वाटोळे झाले आहे. हे थांबवण्यासाठी आर्वजून प्रयत्न करायला हवेत. समाजाला अ ब क ड चा प्रवर्ग उपलब्ध व्हावा, अशा प्रकारचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी मी स्वत: अ ब क ड प्रवर्गासाठीच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटून चर्चा करणार आहे. हे कार्य ज्यावेळी होईल त्यावेळी आपण बोलला तसे वागला, असे मी म्हणेन. त्यावेळी त्यांचा समाज बांधवांकडून मोठ्या सत्कार समारंभाचे आयोजन केले जाईल.
आज, पाऊस असताना मोठ्या संख्येने माय-माऊली येथे आल्या त्यांच्या अंगावर पिवळी साडी दिसते आहे, युवकांनी-तरुणांच्या अंगावरही पिवळा शर्ट दिसतो आहे. जवळपास 80 टक्के बांधवांनी "पिवळा झेंडा' मान्य केला असल्याचे सांगत लक्ष्मणराव ढोबळे यांनी समाधान व्यक्त केले. सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे संयोजक नागेश कांबळे, दिलीप गायकवाड, सतिश सरवदे यांनी मानले.
बांधवांनो संकल्प करा
गावात धनिक माणूस राहतो. गावातल्या वेशीत त्याचे घर असते. पण, दारूचं दुकान टाकताना तो दलित वस्तीतच का टाकतो, त्याच्या आईच्या हातात तो ग्लास का देत नाही, याचा विचार चिंतनातून तुम्ही-आम्ही केला पाहिजे. आपला संसार उध्वस्त का होतो, हे अशा लक्षात घ्यायला हवे. आमच्या वस्तीत दारूचं दुकान काढू देणार नाही, असे दुकान चालू देणार नाही, अशा प्रकारचा संकल्प जयंती दिनी केला पाहिजे. एखादा पुढारी दारू पिऊन दारुबंदीवर भाषण करायला लागला. तर ते भाषण आपण नाकारलं पाहिजे. व्यसनं समाजाने नाकारली पाहिजेत. माय-माऊलींनो आपली मुलगी देताना देखील होणाऱ्या जावयाच्या खिशात सिगरेट आहे का? हे तपासलं पाहिजे. आपल्या लेकीचा गळा कापायचा नसेल तर दारुडा व्यसनाधीन जावई नाकारण्याचे काम माय-माऊलींनी केलं पाहिजे. समाज मंदिरामध्ये ग्रंथालय सुरू करा, पुस्तकाचं कव्हर पुस्तक वाचून फाटलं पाहिजे असा संकल्प करणे म्हणजे अण्णा भाऊंची जयंती साजरी करणे, असे लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
आघाडी सरकारने एक दमडीही दिली नाही
फुले महामंडळ, साठे महामंडळ, वहिदास महामंडळ आणि दिव्यांग महामंडळ या चारही महामंडळांना मिळून 3500 कोटी रुपये देण्याचा ठराव महाविकास आघाडी सरकारने केला होता. परंतु, एक दमडी देखील दिलेली नाही. प्रत्येक महामंडळाच्या खात्यावर 100 कोटी पाठवा म्हणजे बॅंका आमच्या कार्यकर्त्याशी नीट वागतील. गेलेली प्रतिमा पुन्हा मिळवता येईल आणि महामंडळामध्ये जो घोटाळा झाला तेच उगाळत बसू नका. ही महामंडळ उभी राहिली तर समाजाचे संसार उभे राहण्यास मदत होईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, अशी अपेक्षा लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली.

