Advertisement
पुणे : पुणे दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकमंत्री घ्यायला नकार दिला असला तरी बारामतीच्या पवारांना चेकमेट देण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता या बहुचर्चित आणि बहुप्रलंबित पुरंदर विमानतळाचेच घ्या ना. राज्यात मध्यतंरी मविआ सरकार स्थापन होताच पुरंदरचं विमानतळ बारामतीकडे सरकलं होतं. पण सत्तांतर होताच फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरलाच हलवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात सत्तांतर होताच उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी बारामतीला नेलेले विमानतळ पुन्हा पुरंदर तालुक्यात हलवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातलं नवं विमानतळं हे आता अखेर पुरंदरलाच होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
पवारांना मोठा धक्का
मविआ काळात हे विमानतळ बारामतीकडे सरकल्यानंतर मध्यंतरी उद्योगपती गौतम अडानी यांनी बारामतीचा दौराही केला होता. खुद्द राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीच त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरला हलवून बारामतीकरांची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे फडणवीस कितीही नाकारत असले तरी त्यांचं पवारांच्या पुण्यावर किती बारकाईने लक्ष आहे हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.